स्वातंत्र्यौत्तर भारताची यशोगाथा: हरित क्रांती

like 798

स्वातंत्र्यौत्तर भारताची यशोगाथा: हरित क्रांती
दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारत १९४७  साली स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाले म्हणून सर्व प्रश्न सुटले नव्हते, अनेक खडतर आव्हाने समोर आ  वासून उभी होती आणि यातील सर्वात मोठे आव्हान होते ते अन्नधान्य  उत्पादनाचे. कितीही स्वातंत्र्याचा जल्लोष केला तरी पोटाला दोन घास खायला मिळत नाही तोवर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ नव्हता. त्यावेळी आपली लोकसंख्या छत्तीस कोटी होती  आणि अन्नधान्य  उत्पादन पन्नास दशलक्ष टनाच्या आसपास होते. धान्यौत्पादन आणि खाणारी तोंडे यांचा मेळ घालताना राज्यकर्त्यांना कसरत करावी लागत होती आणि त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेकडून धान्य आयात करण्यासाठी पीएल ४८० करार करण्यात आला. करार करून प्रश्न सुटला नाही कारण या करारांतर्गत आलेला गहू आतिशय निकृष्ट दर्जाचा होता. या गव्हाचा उपयोग अमेरिकेत डुकरांना खायला केला जात असे. या घटनेने भारताला अनेकदा आपली मान खाली घालावी, बऱ्याच वेळा आपली नाचक्की पण झाली किंबहुना तत्कालीन जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ पॅडलॉक ब्रदर्स यांनी तर भारत या संकटातून बाहेर पडणे मुश्कील असल्याचे आणि भारताचे आस्तित्व धोक्यात असल्याचे जाहीर करून टाकले होते. आपले काही तत्कालीन राज्यकर्ते पण त्यांच्या गळ्यात गळा घालण्यात धन्यता मनात होते. १९६२ साली कृषी मंत्री एस. के.  पाटील तर अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी अजिबात अनुकूल नव्हते तर अन्नधान्याची आयात करणेच उचीत असल्याचे सांगत होते. पंडित नेहरूनी सुद्धा आपण अन्नधान्य उत्पादनात वाढ  करण्यात अपयशी ठरल्याचे कबुल केले होते. अन्नधान्याच्या आयातीमुळे प्रचंड प्रमाणात परकीय चलन आपल्याला खर्च करावे लागत होते शिवाय अमेरिकेची मनमानी सोबत ठरलेली होती. व्हियेतनाम युद्धात भारताने व्हियेतनामला पाठींबा दिल्यामुळे अमेरिकेचा गुस्सा आणखीनच  वाढला आणि या आयातीमध्ये खंड पडायला लागला. यामुळे इंदिरा गांधी आतिशय व्यतीत झाल्या आणि त्यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला. अण्णासाहेब शिंदे या खंद्या कृषी मंत्र्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.
अण्णासाहेब हे कृषी मंत्री असले तरी प्रथमतः ते शेतकरी होते आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना चांगल्या अवगत होत्या. त्याच काळात त्यांनी "भारताची कृषी समस्या- अन्न समस्या" नावाचे पुस्तक लिहिले. यामध्ये भारतातील कृषी समस्यांचा चांगलाच उहापोह केला होता. हे  पुस्तक पुढे जाऊन हरितक्रांतीची 'ब्लु प्रिंट' बनले आणि याच्याच आधाराने हरितक्रांतीची दिशा ठरवली गेली.  या पुस्तकामध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी करायच्या मुलभूत गोष्टींचे सखोल विवेचन केले होते. शेतकऱ्याच्या मालाला योग्य मोबदला देण्यावर भर देण्यात आला आणि शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता काही जोडधंदे करावीत जेणेकरून त्यांना अधिक उत्पादन मिळेल यासाठी प्रोस्थाहन देण्याचे म्हटले होते. या जोडधंद्यामध्ये दुध उत्पादन, कुकुट पालन याच्या वापरावर भर दिला. या पुस्तकामध्ये कृषी संस्थांना बळकटी देण्याबाबत विचार सर्वप्रथम मांडला होता. हरितक्रांती ही काही एक दिवसात घडलेली घटना नव्हती किंबहुना एखादया निर्णयाने घडलेली घटना नव्हती तर एकमेकांवर अवलंबलेल्या अनेक घटनांचा परिणाम म्हणजे ही  उत्पन्न वाढ होती. एका ध्येयाने पछाडलेल्या अनेक व्यक्तींनी केलेल्या अखंड परिश्रमाचे ते फलित होते.
हरितक्रांतीची विभागणी काही टप्प्यात करायची झाल्यास पुढील घटनांचा उल्लेख करावा लागेल. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही  संस्था शेती संबधी काम करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेची पुनर्रचना करण्याचा विचार प्रवाह जेव्हा समोर आला तेव्हा भारत सरकारने अमेरिकेच्या संयुक्त पणे डॉ पारकर कमिशन स्थापन केले या कमिशनच्या शिफारशीनुसार ICAR संस्थेला अधिक स्वायत्तता देण्यात आली. भारत सरकारच्या कृषी विभागांतर्गत Department of Agricultural Research and Education (DARE) ची स्थापना  करण्यात आली. राज्यामधील कृषी विद्यापीठाना संशोधनासाठी पाठींबा देण्यात आला.  UPSC च्या धरतीवर कृषी संशोधकांच्या निवडीसाठी Agricultural Research Service (ARS) ची स्थापना करून Agricultural Scientists Recruitment Board (AERB) हे स्वतंत्र मंडळ बनवले त्यामुळे तरुण संशोधकांचा ओढा संशोधनात दाखल झाला. याशिवाय तीन नवीन राष्ट्रीय संस्थांची निर्मिती करून नवीन संशोधनाची दिशा ठरवली. यापैकी Indian Agricultural Research Institute (IARI) या संस्थेची धुरा डॉ स्वामिनाथन यांच्या खांद्यावर दिली. पुढे जाऊन त्यांनी जे काही अदभुत काम करून दाखवले त्यामुळे ते भारतीय हरितक्रांतीचे पितामह ठरले.
हरितक्रांती या शब्दाचा इतिहास बघायला गेलो तर आपल्याला अमेरिकेत जावे लागेल. विल्लिअम गौड यांनी याचा सर्वप्रथम वापर केला. रॉकफेलर फौंडेशनने मेक्सिको मध्ये सुरु केलेल्या धान्यौत्पादन अभियानांतर्गत गहू पिकाचे  उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी नॉर्मन बोरलौंग यांच्यावर सोपवली होती. अतिशय दुर्गम प्रदेशात कुठल्याही सुविधाशिवाय राहून त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेललीच नाही तर संपूर्ण जगासमोर एक आदर्श निर्माण केला. सतत तेरा वर्षे केलेल्या अथक परिश्रमाच्या जोरावर मेक्सिको देश भूक बळीच्या संकटातून बाहेर आला. पुढे जाऊन त्यांनी आपला मोर्चा आशियाई आणि अफ्रिकन देशांकडे वळवला आणि तेथेही आपल्या बियाण्यांच्या मदतीने अचंबित करणारे परिणाम दाखून दिले. जगात भूक बळींच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाले. याची परिणीती म्हणून त्यांना १९७० सालचा शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर झाला. धान्यौत्पादानाला मदतीचा हात देऊन सर्वांचीच क्षुधा शांत करणाऱ्या आधुनिक ऋषीचा यथोचित गौरव झाला. त्यांच्या कामाचा परिसस्पर्श आपल्या पण वाटयाला आला हे आपले भाग्य. भारत सरकारने पुढे जाऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न्न केला. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सरकारने लुधिआन येथे बोरलौग इन्स्टिटुट फॉर साउथ इस्ट एशिया (बिसा) या संस्थेची मुहुर्थमेढ रोवली असून नुकतेच  बोरलौग यांच्या भारतभेटीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्धल दिल्ली येथील पुसा संस्थेमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. डॉ स्वामिनाथन यांनी बोरलौग यांच्याकडून बुटक्या जातीच्या गव्हाचे बियाणे नोरीन १० आणले आणि त्याची लागवड केली. याशिवाय लेर्मा ऱोजा ६४A आणि सोनोरा ६४ बियाणे देखील मागवले. हे बियाणे आपल्याकडे चांगला प्रतिसाद देत असल्याचे आढळून आल्यावर देशभर त्याचा प्रसार करण्याची योजना आखण्यात आली आणि राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना (National demonstration programme) सुरु करण्यात आली.  लहानात लहान शेतकऱ्याच्या शेतावर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हळूहळू शेतकऱ्यांकडून देखील बियाणांची मागणी वाढू लागली. १९६५ साली २५० टन बियाणे मेक्सिको कडून आयात करण्यात आले. दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा आठवडयातून एक वेळ भात न खाण्याचे भावनिक आव्हान केले तसेच "जय जवान जय किसान" चा नारा देऊन शेतकरी वर्गाचा जयजयकार केला. एवढे करून ते थांबले नाहीत तर पाहिजे तेवढे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. या सर्व गोष्टीमुळे शेतीमध्ये चैतन्य निर्माण झाले. फक्त परदेशातून बियाणे आयात केले म्हणून सर्व काही काम झाले अशी परिस्थिती नव्हती. याचबरोबर त्याला साथ देण्यासाठी खते, रासायनिक औषधे, आधुनिक औजारे आणि नवनवीन शेती पद्धतीचा विकास या सर्वांचा मेळ घालणे आवश्यक होते  आणि ही  अनेक आघाड्या वरची जबाबदारी प्रत्येकजण आपल्या परीने चोख पार पाडत होता. यामध्ये मुख्यतः  चार जणांचा उल्लेख करावा लागेल. कृषिमंत्री सी सुब्रमन्न्यम, कृषी राज्य मंत्री अण्णासाहेब शिंदे, कृषी संशोधक डॉ स्वामिनाथन आणि कृषी सचिव शिवरमण या चौकडीने केलेल्या अथक परिश्रमामुळे हरितक्रांती सफल झाली. धान्यौत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची हमी देणे आवश्यक असते यासाठी शासनाने आधारभूत किंमत लागू केली ज्यामुळे शेतकरीवर्गाला आपल्या उत्पन्नाला किती पैसे मिळतील याचा अंदाज येऊ लागला आणि याचा सकारात्मक परिणाम उत्पादनावर झाला, लोक बिनधास्त पणे पिकाची लागवड करू लागले आणि त्यामुळे उत्पादन वाढीला मदत झाली. या सर्व गोष्टीची परिणीती म्हणून भारत अन्नधान्याच्या संकटातून बाहेर पडला. १९७१ साली आपले  धान्यौत्पादन ११६ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले होते. यावेळी भारताने पाकिस्तान वर युद्धात ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि बांगलादेशाची निर्मिती केली होती त्यामुळे जगभर आपला दबदबा वाढला होता. अमेरिकेने या युद्धात उघडपणे पाकिस्तानला मदत केली असली तरी भारत खंबीरपणे अमेरिकेच्या विरुद्ध उभा राहू शकला तो केवळ हरितक्रांतीच्या जोरावर. बांगलादेशातून आलेल्या दहा लक्ष निर्वासितांना पोसण्याची जबाबदारी भारताने वर्षभर पेलली आणि आपल्यामध्ये जगाला पोसण्याची कुवत असल्याचे सर्वाना  दाखून दिले एवढेच नव्हे तर तत्कालीन अमेरिकन राजदूताने ते सर्वासमक्ष कबुल पण केले. हरितक्रांतीने भारताला जागतिक स्थरावर मानाचे स्थान मिळवून दिले आणि भारतामध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यामुळे स्वातंत्र्या नंतरच्या इतिहासात हरितक्रांतीच्या घटनेला खूप मानाचे स्थान आहे.
अन्नधान्य उत्पादन वाढले म्हणून हरितक्रांती झाली असे नव्हे तर यामध्ये दुध उत्पादना बरोबर शेती सलग्न जोडधंद्याचा पण तितकाच महत्वाचा वाटा होता.  भारत स्वतंत्र झाला तेव्हा दुधाची एक बाटली मिळणे लोकांना दुरापास्त होते. त्यावेळी भारतीय गाई कडून सरासरी अर्धा ते एक लिटर दुध मिळत होते. एवढ्याशा दुधावर किती लोकांचे भागणार हा यक्ष प्रश्न होता. कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलापासून दुग्धउद्योग मागे राहिला नाही आणि त्याने पण बदलाची कात टाकली. भरभक्कम राजकीय पाठबळाच्या जोरावर IVRI, NDDB सारख्या संस्था उदयाला आल्या. सरकारने सहकार क्षेत्राला चालना देऊन त्यासाठी भरगोस मदत केली. अमूल सारख्या संस्थेला भरभक्कम पाठबळ दिले. त्यातूनच पुढे जाऊन वर्गीस कुरिअन सारखा साधा सेवक सफेद क्रांतीचा पितामह बनला.
हरितक्रांतीच्या जोरावर भारत अन्नधान्य उत्पादनात स्वंयपुर्णच झाला नाही तर अनेक क्षेत्रात आपले आघाडीचे स्थान मिळवले. दुग्ध उत्पादन, कडधान्य उत्पादन, अंबा, चहा, केळी, पेरू, पपई, भेंडी उत्पादनात आज आपण अव्वल आहोत. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही आपले धान्य उत्पादन या वाढत्या लोकसंख्येची गरज भागू शकत आहे. यातूनच अन्नसुरक्षा सारखी महत्वकांक्षी  योजना आकार घेऊ पहात आहे. १९६२ सालापासून आपली लोकसंख्या २५०% नी वाढली असली तरी अन्नधान्य उत्पादन सुद्धा २५० दशलक्ष टन पर्यंत पोहोचले आहे. तसेच फळे आणि भाजीपाला उत्पादनात आपण २४०  दशलक्ष टन आकडा गाठला आहे. हे सर्व आकडे आचंबित करणारे तर आहेच शिवाय आपल्या श्रेष्ठत्वाची परीचीती देणारे आहेत.
हरितक्रांतीचे गोडवे गात आसतानाच त्याच्या मर्यादांचा पण या ठिकाणी विचार करणे क्रमप्राप्त आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाचे आकडे आकाशाला भिडायला जात असताना प्रती हेक्टरी उत्पादन आपल्याकडे कमी कमी होत असल्याचे चित्र हळूहळू समोर येत आहे. जागतिक तुलनेत आपण आतिशय मागे आहोत आणि जमिनीची पोषकता दिवशेदिवस कमी होत आहे. भात, गहू आणि मका या प्रमुख अन्नधान्य पिकांचा विचार केला तर प्रती हेक्टरी उत्पादकता अनुक्रमे ३.५ टन, १.६ टन आणि २.१ टन आहे तर तीच चीन मध्ये ६.६ टन, ४.८ टन आणि ५.४७ टन आहे. ही गोष्ट  निश्चितच भूषणावह नाही. हरीतक्रांतीबरोबर अन्नधान्य सुरक्षितता येत असताना ती समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. पण ते तसे झाले नाही तर त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होण्याचा धोका तेव्हाच यशवंतराव चावण यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याने दिला होता. यातील विषमता रोखली नाही तर हरीत्क्रांतीतून लाल क्रांतीचा जन्म होईल असे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्ष आता लाल क्रांती नसली तरी विषमतेची दरी मात्र वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी केवळ शहरे किंवा ग्रामीण भागातील ठराविक समाजापर्यंत मर्यादित असलेली संपत्ती हरितक्रांतीमुळे जमीन असलेल्या वर्गापर्यंत एकवटली गेली आहे. यामुळे गरीब श्रीमंत यांच्यातील अंतर आणखीनच वाढत चालल्याचे जाणवत आहे. हरितक्रांतीच्या कालखंडामध्ये उत्पन्नाचे आकडे दिवसेदिवस वाढत असताना पाणी समस्या आणखीनच गंभीर झाल्याचे एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर समोर येत आहे. संपूर्ण भारतभर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. अनेक राष्ट्रांनी त्याचा पायरव आधीच ओळखून आपल्यापुरती तजवीज करून ठेवली आहे. इस्राईलसारखी नखा एवढी राष्ट्रे पाणीबचतीचा पराकोटीचा मार्ग अवलंबून देशाला समृद्धीच्या महामार्गावर नेताहेत. मात्र नैसर्गिक संपत्तीचा वरदहस्त असलेल्या भारतात मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दुष्काळ तर येथे पाचवीला पुंजलेला असतो. पाण्याचा वापर सोन्यासारखा करण्याची वेळ केव्हाच आली आहे. यातून आपण बोध घेतला नाही तर भविष्यात फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. हरितक्रांतीचा उदोउदो करत असताना ज्याच्या आधारे ती यशस्वी झाली तो आधारच नष्ट झाला तर शेती उत्पादन कमी व्हायला वेळ लागणार नाही.
हरितक्रांतीच्या कालखंडात कीटकनाशके, खते, पाण्याचा आती वापर वाढला, शेतीमध्ये आधुनिकीकरणाचे वारे वाहायला लागले. नवनवीन औजारांचा वापर वाढला. एकदा यशस्वी झाले कि इथला शेतकरी आपली "पटरी" सोडून चालत नाही असे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे लोक अधिकाधिक संसाधनाचा वापर करू लागले परिणामी आतीवापर झाल्यामुळे याचे दुष्परिणाम समोर यायला लागले. किडी मध्ये रसायनाविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढायला लागली त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या अनेक औषधांना या किडी दाद देत नसल्याचे समोर आले आहे. अती खतांच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्या आहेत. शेकडो एकर जमिनीवर पांढरा थर दिसून येत आहे. अशा जमीनीची उत्पादकता कमी होऊन त्या नापीक बनल्या आहेत.   शेतकऱ्यांच्या उन्नतीला कारणीभूत ठरलेली कीड नाशके त्यांचाच कर्दनकाळ ठरू लागली आहेत. किडीला मारायला आणलेली औषधे शेतकरी स्वतःच्या पोटात रिचउन स्वतःला संपवत आसल्याचे भयानक चित्र आपल्याला बघायला मिळाले हे आपले फार मोठे दुर्दैव्य आहे. हरीत क्रांतीचे गोडवे गात असताना हजारो शेतकरी आपला जीव संपवत होते हा भारतीय शेती इतिहासातील सर्वाधिक दुखःद कालखंड म्हणावा लागेल . शेती उत्पादनाचे आकडे वाढत असताना आत्महत्याचे आकडे पण वाढत चालल्याचे आपल्याला याच काळात बघावे लागले. कीडनाशकामुळे होणारे प्रदूषण, खराब पाणी यामुळे वाढलेली कुष्ठरोग्यांची संख्या पंजाब हरियाना सारख्या प्रगत राज्याला निश्चित भूषणावह नाही. केरळ मध्ये एन्डोसल्फान च्या अतिरेकी वापरामुळे अनेक समस्या उदभवल्याचे निदर्शनास आले आहे.
पण हळूहळू या परीस्थितीत सुद्धा बदल होताना दिसत आहेत. कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या वृत्तीनुसार भारतीय शेतकरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. रासायनिक खते, औषधे यांचा कमीत कमी वापर करून अन्नधान्य उत्पादन घेण्याकढे अनेकांचा कल वाढतो आहे. सेंद्रिय शेतीची कास अनेक शेतकरी धरू पाहत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये वाढ  होत असून त्याचा ग्राहक वर्गही असा माल आवर्जून खरेदी करत आहेत. वैज्ञानिक तत्वावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,  एकात्मिक कीड व्यवस्थापन सारखे नवनवीन मार्गांचा उपयोग शेतकरी करत असल्याचे आशादायक चित्र आता समोर येत असून हरीतक्रांतीकडून सदा हरीतक्रांतीकडे आपली वाटचाल नवीन पहाट घेऊन येईल यात शंका नाही.

 

Posted By : Sayaji Mehetre, PhD
Please sign-in to post comments

Mohit Bhise

Agriculture
It is a source of making food. It is useful for farmer. There are many step in agriculture such as-
1)Preparation of soil
2)Sowing
3)Adding manure and fertiliser
4)Irrigation
5)Protecting from weeds
6)Harvesting
7)storage
So, 1)Preparation of soil
=1)It is the first and most important step in agriculture.
2)In the method preparation of soil, it is important to loss and turn soil.
2)Sowing
=1)It is second most important part of agriculture.
2)Good quality seeds are selected.
3)Good seeds are healthy and clean seeds of a good variety.
3)Adding manure and fertiliser
=The substances which are added to the soil in the form of nutrients for the healthy growth of plants are called manure and fertiliser.
4)Irrigation
=The supply of water to crops at different intervals is called irrigation. The time and frequency of irrigation varies from crop to crop, soil to soil and season to season.
5)Protection from weeds
= In a field many other undesirable plants may grow these are known as weeds.

Posted on : 18-08-2017 07:21:04

Mohit Bhise

6)Harvesting
=Harvesting of a crop is an important task. The cutting of crop after it is mature is called harvesting.
7)Storage
=Storage of grains is an important task. The grains should be safe from moisture, insects, rats and microorganisms.The large scale storage of grains is done in silos and granaries to protect them from pests like rats and insects.

Posted on : 18-08-2017 09:27:09

rakesh

best

Posted on : 04-10-2018 05:30:39